Wednesday 31 January 2007

नट्सफ़र्ड

२००३ सालच्या सप्टेंबर महिन्यात तनुला भेटायला मी नट्सफ़र्डला गेले होते. तनु माझी इंग्लंडमधली पहिली मैत्रिण. मी पोचल्याच्या दुसर्‍या आठवड्यात ती केंब्रिजला आली होती. माझ्या घराची, बँकेची वगैरे घडी बसवून मला तिच्या घरी नट्सफ़र्डला येण्याचं आग्रहाचं आमंत्रणही देऊन गेली होती. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी जाण्याचे बेत आखायला सुरुवात केली. नट्सफ़र्ड मँचेस्टरजवळचे एक छोटे खेडे आहे. समुद्राकाठी राजशिळेवर बसून लाटेला थांबण्याची आज्ञा करणार्‍या कनूट राजावरून याचे नाव पडले आहे. केंब्रिजहून नट्सफ़र्डला जायला थेट आगगाडीची सोय नाही. त्यामुळे तीन ठिकाणी गाडी बदलून जावे लागणार होते. मला इंग्लंडमधे पोचून एक महिनाही पुरा झाला नव्हता. इंग्रजी लोकांचे उच्चार काही केल्या कळत नसत आणि मी काय सांगते, विचारते आहे ते त्यांना कळतेय की नाही हेही कळत नसे. त्यामुळे तनुला माझी तशी काळजीच वाटत होती. मी मात्र 'त्यात काय; जमेल!' अशी निवांत होते.
शुक्रवारी संध्याकाळी साधारण साडेचार पाचला केंब्रिजहून निघायचे, रात्री नऊपर्यंत नट्सफ़र्डला पोचायचे, शनिवार-रविवार तिथे हिंडून रविवारी रात्री घरी परत असा एकंदरित बेत होता. जाताना मला तीन ठिकाणी गाडी बदलून जायचे होते. येताना दोन ठिकाणी बदलून यायचे. पहिली गाडी ४.३० ला केंब्रिजहून इलीला जाणारी, तिथे ४.५०ला पोचणार होती. दुसरी इलीहून ५.०० वाजता स्टॉकपोर्टला जाणारी गाडी तिथे ८.२५ला पोचणार होती आणि शेवटची स्टॉकपोर्टहून नट्सफ़र्डला जाणारी गाडी ८.३५ला निघणारी गाडी ९ला मुक्कामी पोचणार होती. साडेआठ-पावणेनऊपासून तनु माझी नट्सफ़र्डच्या स्थानकावर वाट पाहणार होती. शिवाय काही घोळ झाला तर भटक्या (मोबाईल) होताच. मी नकाशात पाहून ठेवले होते. थोडेफार पूर्वपश्चिम होत सरळ उत्तरेकडे जायचे होते.
गाड्या बदलायच्या वेळांचे टिपण, नकाशाची एक प्रत, हरवल्यावर संपर्क साधायच्या दूरध्वनी क्रमांकांची यादी अशी सगळी कागदपत्रे घेऊन, पैशाचा बटवा घेतला आहे कि नाही हे परत परत तपासत मी ४ वाजता केंब्रिज स्थानकावर पोचले. तनुने तरुण प्रवाशांसाठीचा सवलतीचा अर्ज भरायला सांगितले होते. '३५% पैसे वाचतात. उगीच आळस करू नकोस.' ती म्हणाली होती.आत शिरून पाहते तर 'आजच्या प्रवासासाठीच्या' खिडक्यांसमोर भलीमोठी वळत वळत फिरणारी रांग. ती पाहून पोटात एक छोटा गोळा आला. 'सवलत जाऊ दे; साडेचारपर्यंत तिकीटतरी मिळेल का? आणि नाही मिळाले तर...' असा विचार करत रांगेत उभी तर राहिले. चार खिडक्या होत्या आणि त्यांचे काम भराभर चालले होते. रांग सतत सरकत होती. जसजशा खिडक्या जवळ आल्या गोळे बिळे विरघळून जाऊ लागले.

'४.१०'
'४.१३'
'४.१५'
'४.१७'
'चला आता आपलीच पाळी.' मी आनंदाने खिडकीपलिकडच्या काकांकडे बघून हसले.
"मला नट्सफर्डचं तिकिट हवं आहे आणि तरूण प्रवाशांसाठीचा..."
"त्या पलिकडच्या खिडकीत जा. अर्ज वगैरे तिकडेच असतात."
"!!!!?"

'पलिकडे' मुळीच रांग नव्हती. मी पळत तिकडे गेले.

"तरुण प्रवासी..." गडबडीत खिडकीपलिकडच्या काकूंना म्हणाले. त्या 'त' वरून ताकभात ओळखणार्‍या हुशार असल्याने त्यांनी ताबडतोब अर्ज पुढे केला. 'नाव, जन्मतारीख, पत्ता... बाप रे! पिन काय होता आपल्या घराचा? हां. आठवला. छे! कसलं गिचमिड अक्षर आलंय. छायाचित्र!? आता ते कुठे मिळणार? वा! आहे एक बटव्यात! चला. अर्ज भरून झाला. ४.२३.'

तिकिट आणि 'तरूण' ओळखपत्र घेऊन मी धावत फलाटावर आले.

केंब्रिज स्थानकावर एकच एक लांबलचक फलाट आहे. त्याचेच ४ भाग केले आहेत. मधे मधे जोडण्या घालून या रुळांवरून पलिकडच्या, त्या पलिकडच्या रुळावर गाडीला जाता येते. मधे थोडी जागा सोडून गाड्या एका मागे एक उभ्या राहतात. गाड्या छोट्या छोट्या असतात त्यामुळे जमते. 'चढताना बरोबर गाडी आहे ना खात्री करून मगच चढ.' इति तनु. छोट्या निळ्या पडद्यावर मी इलीच्या गाडीचा फलाट शोधला. तो समोरच होता, पण रिकामा. गाडीच्या समोर येण्याची वेळ ४.४५! १५ मिनिट उशीरा! इलीमधे गाडी बदलायला मला १० मिनिटांचा वेळ होता. पहिली गाडी उशीरा म्हणजे नक्कीच पुढच्या सगळ्या गाड्या चुकणार! पोटात एक नवा मोठा गोळा तयार होऊ लागला. तनुला सांगायचा प्रयत्न केला तर तिचा भटक्या दाद देईना. गाड्यांच्या घोळाचा तिला एक निरोप लिहिला. तुझा भटक्या वाजत नाहीये हेही लिहिले. तिचे काहीच उत्तर नाही.'कदाचित स्टॉकपोर्टची गाडीसुद्धा उशीरा येईल.' आशावादी मन हळूच म्हणाले. पण त्यात काही दम नव्हता. गाडीच्या येण्याची वेळ सतत बदलत होती. एखादे मिनिट मागे पुढे जात होती. ती ४.४० झाली आणि तितक्यात गाडी आली. फलाटावर जमलेल्या सगळ्याच लोकांना त्याच गाडीने जायचे होते. सगळी गर्दी एकदम दारांकडे सरकू लागली. मीही फार विचार न करता वहात वहात गाडीत पोचले. आत सायकली, मोठाल्या पिशव्या, लहानमुलांच्या ढकलगाड्या आणि विविध रंगांची, मापांची माणसे सगळे खच्चून भरले होते. मला पुलंच्या करंजीची आठवण झाली. 'विलायतेतही लोक असे करंजीतल्या सारणासारखे प्रवास करतात म्हणजे कमाल आहे बुवा!' एक मन म्हणत होते. ' करंजी असो नाहीतर चकली आपल्याला पुढची गाडी मिळणार नाही आहे.' दुसरे मन आठवण करून देत होते.
एव्हढ्या गर्दीत असल्याने की गाडी सुटून प्रवास एकदाचा सुरू झाल्याने माहित नाही पण हळूहळू माझी भीती मावळू लागली. 'जे होईल ते पाहू' असा नेहमीचा विचार परत घट्ट झाला. मी उभ्या उभ्या खिडकीतून डोकावून बाहेरची शेते पाहण्याचा प्रयत्न करू लागले. इतका वेळ माझ्या खांद्यावरची पिशवी मी गाडीबरोबर हलेन तशी हलत होती नि शेजारच्या भीमरूपी काकांना लागत होती. जरासे स्थिरस्थावर झालेय असे पाहिल्यावर त्यांनी मला अगदी नम्र आणि मृदू स्वरांत विचारले,"क्षमा करा; पण तुमची पिशवी वर ठेऊन देऊ का मी?"
"हो हो." असं म्हणत मी पिशवी पुढे केली. त्यांनी ती लीलया वरच्या सामानाच्या कप्प्यात ठेऊन दिली. मी हळूच आभाराचे काही शब्द पुटपुटले. नक्की कसे नि किती (!) आभार मानायचे हे मी अजुनही नीट शिकलेले नाही.

५ वाजता गाडी इलीला पोचली. भीमकाकांनी पिशवी लगेच काढून दिली. माझ्याबरोबर गाडीतले निम्मे लोक इलीला उतरले. माझ्यासारखे बरेच स्टॉकपोर्टच्या त्या गाडीने जाणारे होते. ते सगळे स्टॉकपोर्ट-मँचेस्टर असे काहीबाही बोलत एका दिशेने धावायला लागले, मी त्या जथ्थ्यात सामील झाले. फलाटाच्या दुसर्‍या टोकाला पोचल्यावर तिथल्या अधिकार्‍याने कोर्‍या चेहर्‍याने स्टॉकपोर्टची गाडी नुकतीच गेल्याचे सांगितले. पुष्कळसे लोक रागावून भांडू लागले. नुकसान भरपाई द्या वगैरे म्हणू लागले. त्यावर त्या अधिकार्‍याने ज्यांना हवे त्यांनी 'तक्रारीचा अर्ज' लिहून द्यावा असे बर्फाळ आवाजात सांगितले. भारतीय आगगाडी अधिकार्‍यांना ही स्थितप्रज्ञता ब्रिटिशांकडून वारसाहक्काने मिळाली कि काय असे मला वाटून गेले. इथे भांडण्यात अर्थ नाही हे लक्षात येऊन मी 'माहिती केंद्राच्या' शोधात निघाले. ते लगेच सापडले. माझ्याहून शहाणे लोक तिथे आधीच रांग करून उभे होते. माझी पाळी आल्यावर मी सगळी कथा त्या माहितीसुंदरीला सांगितली. तिने नट्सफ़र्ड हे नाव ऐकले नव्हते. पण सुदैवाने तिच्या संगणकाला ते माहित होते. आता इथून थेट स्टॉकपोर्टला जाण्याऐवजी लेस्टरला जावे लागेल व तिथे गाडी बदलून स्टॉकपोर्ट गाठता येईल असे त्याने सांगितले. तिथून ८.३५ ऐवजी ९.३५ची नट्सफ़र्ड गाडी मिळणार होती.
सव्वा पाचची लेस्टर गाडी सुद्धा करंजीच होती. आधीच भरून आलेली त्यात आम्हा इलीत स्टॉकपोर्ट गाडी चुकलेल्या मंडळींची भर. खांद्याची पिशवी सांभाळत मी कशीबशी लटकून उभी राहिले. सुदैवाने पुढच्या दोन थांब्यात पुष्कळ लोक उतरून गेले आणि मला बसायला छानपैकी खिडकीजवळची जागा मिळाली. साधे बसण्यातही किती सुख आहे हे तत्काळ जाणवले. सावकाश पिशवीतून श्रवणयंत्र (इअरफोन्स) काढले, नुकतीच घेतलेली मोझार्टची तबकडी काढली, तबकडीचे यंत्र काढले. 'ही गाडी सव्वासातला पोचणार म्हणजे दीडेक तास निवांत श्रवणभक्ती करावी.' असे म्हणत कानात श्रवणयंत्र घातले. हिरवी शेते भराभर पळत होती. गाडीची सावली पळताना वरखाली होताना दिसत होती. मधुन अधुन झबली घातलेले घोडे, चरणार्‍या मेंढ्या, डुकरे दिसत होती. पहात पहात माझे डोळे मिटू मिटू झाले. पियानोचे स्वर भरून राहिले होते आणि पार्श्वभूमीवर आगगाडीचा एका लयीतला आवाज. डावीकडे सूर्य मावळत होता, त्याचा प्रकाश चेहर्‍यावर छान वाटत होता. आपण तरंगत चाललो आहोत असे वाटत होते. 'वा! आयुष्य सुंदर आहे.' वगैरे विचार माझ्या डोक्यात येत होते तितक्यात एक विचित्र वास आला. तंद्री भंगली. तरी डोळे उघडवत नव्हते. पण वास जास्त जोरात आला आणि मी नीट जागी झाले. डोळे उघडल्यावर वासाचा उगम लगेच दिसला. माझ्या समोर बसलेल्या मुलीने एक बिअरची बाटली उघडली होती. सावकाश घुटके घेत ती हातातले मासिक वाचत होती. मी सोडून कोणाचे तिकडे लक्ष गेले असेल असे वाटत नव्हते. प्रवासात बिअर पिणे नियमात बसत असावे अशी मी स्वतःची समजूत घातली. पण आता डोळे मिटेनात. उघड्या डोळ्यांनी आणखी पुष्कळ 'पिणारे' प्रवासी दिसले आणि प्रवासात प्यायलेच पाहिजे असाच काहीतरी नियम आहे कि काय अशी मला शंका येऊ लागली.
मी पेयांच्या चिंतनात मग्न असताना अचानक खिशातला भटक्या उड्या मारू लागला. 'तनु! अरे हो! तिला कळवलेच नाही काय काय झाले ते.'
ती काळजीने अर्धी झाली होती. माझा निरोप मिळाल्यावर तिने पुष्कळदा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण गाडीच्या करंजीत मला भटक्याचा आवाज, उड्या काही म्हणता काही कळले नव्हते. तनुला नवे वेळापत्रक सांगितले. लेस्टरला सव्वासातला पोचणार आहे पोचल्यावर सांगेन असे म्हणून तिचा निरोप घेतला. इतक्यात गाडी एका गावात पोचली. माझ्या समोरची बिअरवाली मुलगी तिथे उतरली. दोनेक मिनिटात गाडी सुटली. जवळचा वास कमी झाल्याने थोडे बरे वाटत होते. स्थानकाच्या इमारती ओलांडून गाडी पुढे आली तर एकदम डोळ्यावर सूर्य आला! इतका वेळ सूर्य डाव्या हाताच्या लांबच्या खिडकीत मावळत होता. 'माझी खिडकी' माझ्या उजव्या हाताला होती. आता सूर्य इकडे आला म्हणजे गाडी दक्षिणेकडे चालली होती!
'बाप रे!'
'गाडीत चढताना नीट खात्री करून...' तनुचे वाक्य आठवायला लागले.
'पण इलीत एकच गाडी लागलेली होती सव्वापाचला. शिवाय माहितीसुंदरीच्या संगणकाने सांगितलेल्या फलाटावरच होती ती. आणखी कसली खात्री करणार?'
'गाडी शेजारच्या पडद्यावर काय लिहिले होते बघायचे राहिले!' नंतर आठवण करून देणार्‍या मनाला आठवले. शेवटी, 'पुढच्या गावात उतरून काय करता येईल ते बघूया' असा 'जे जे होईल ते ते ..' विचार करून मी मावळत्या सूर्याकडे पाहू लागले. पाहता पाहता सूर्य हळूहळू मागे पडला; गाडीच्या मागे गेला आणि सावकाश वळून डाव्या खिडकीत येऊन स्थिरावला. गाडीने उलटे वळण घेतले होते. या आधीचे उलटे वळण तनुशी बोलण्याच्या नादात माझ्या लक्षात आले नव्हते! 'हुश्श!' जीव भांड्यात पडला. आता पुन्हा मोझार्ट आणि सूर्यास्त सुंदर वाटू लागले आणि डोळेही मिटले.

सात वाजता भटक्या वाजला. तनुने मी झोपले असेन अशा काळजीने लेस्टर येण्याची आठवण केली. मी तशी जागीच होते. सव्वासातला लेस्टर आले. स्टॉकपोर्टची गाडी सापडली. तिच्या शेजारच्या पडद्यावर वाचून खात्री केली. आता सूर्य मावळला होता त्यामुळे तसाही दिशा कळायला काही मार्ग नव्हता. गाडीत चढले तर ती पूर्ण रिकामी! त्यातून आतली सजावट एकदम अलिशान. मी चुकून पहिल्या वर्गाच्या डब्यात चढले कि काय अशी शंका येऊन खाली उतरले. आणि पुढच्या डब्यात शिरले. तिथेही तीच परिस्थिती. मऊ गालिचे, मखमली खुर्च्या आणि चिटपाखरूही नाही. ताबडतोब भटक्यातून तनुला हाक मारली. तिलाही आश्चर्य वाटले.
"पडद्यावर काय लिहिले आहे?" तनु
"स्टॉकपोर्ट, मँचेस्टर." मी
"गाडीच्या बाहेरचे पिवळे दिवे चालू आहेत का?"
"हो. आहेत."
"सगळे डबे भारीपैकी आहेत का?"
"मी दोन बघितले. तिसरा बघायला जाऊ का?"
"नको. पहिल्या वर्गाचा जास्तीत जास्त एक डबा असतो. मृ, तू गाडीत चढ. चुकायला नको ती!"
"अगं, गाडीच चुकीची असली तर?"
"तू चढ तर."
"चढले. अरेच्चा! आत एका छोट्या सरकत्या अक्षरांच्या पडद्यावर लिहिले आहे स्टॉकपोर्ट-मँचेस्टर!"
"छान!" तनुच्या आवाजातला ताण गेला.
"पण आत कोणीच नाहीये."
"असू दे. बस तू मजेत. झोप आली तर झोप. मी उठवेन तुला ९ ला."

दारात उभी राहून मी बोलत होते. तेव्हा नकळत तिथे लिहिलेल्या गोष्टी वाचत होते. 'दार कसे उघडाल' आणि तीन आकृत्या देऊन पायरीपायरीने दार कसे उघडायचे दाखवले होते.
१. खिडकी उघडा. (दाराला एक छोटी खिडकी होती.)
२. बाहेर वाका. ('बाप रे!')
३. हाताने दाराची कडी आपल्यापासून दूर ढकला. आता दार उघडेल.
"तनु, मला वाटतंय मला हे दार उघडायला जमणार नाही!"
"दार? तू गाडीत चढलीयस ना?"
"हो. आत्ता उघडं आहे ते. पण उतरताना? मी एकटीच आहे ना डब्यात. हात पोचला नाही तर?" मी तिला दार उघडायच्या पायर्‍या वाचून दाखवल्या.
"हात पोचतो गं. काळजी करू नकोस. असली दारं बनवताना सगळ्या लोकांचा विचार करूनच बनवतात."
पण तिच्या आवाजातला गेलेला ताण परत डोकावला होता. एव्हाना गाडीतल्या घोषणा सुरू झाल्या होत्या. "व्हर्जिन ट्रेन्स तर्फे सर्व प्रवाशांचे स्वागत."
'कुठे आहेत सर्व प्रवासी?' मी मनात.
"ही गाडी स्टॉकपोर्ट आणि मँचेस्टरसाठी आहे."
तनुला हे भटक्यातून ऐकू गेले. आणि तिने आणखी एकदा हुश्श केले. दोन तीन वेळा घोषणा देऊन स्वागत, आभार वगैरे म्हणून घोषणा बंद झाल्या. दारे बंद होण्याची शिट्टी वाजली आणि गाडी सुटली.
आता खरे तर कसलेही वास नव्हते. मंद प्रकाश, उबदार हवा, गुबगुबीत खुर्च्या असे सगळे असूनही झोप येईना. पियानो बदलून मारव्याची सरोदची तबकडी लावली तरी मजा येईना. खिडकीबाहेरच्या अंधारातून डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. पण लांबवर लुकलुकणार्‍या दिव्यांच्या रांगेखेरीज काही दिसत नव्हते. वेळ सावकाश चालला होता. भटक्यामधे कुठले कुठले खेळ आहेत; ते कसे खेळायचे त्याचं संशोधन करण्यात थोडावेळ गेला. मग गाडीतली खाद्यपदार्थ विकणारी गाडी आली. गाडीसुंदरीला माझ्यात गिर्‍हाईक दिसले नाही ते बरे झाले. तरी एक हसरा कटाक्ष टाकून ती गेली. थोड्या वेळाने तीच सुंदरी तिकिटांचा डबा घेऊन आली! 'तिकीट तपासनीस आणि खाद्यविक्रेती दोघी एकच? बहुधा गाडीत गर्दी कधीच होत नसणार. तरीच इतकी स्वच्छ टिकली आहे.' मी हसून तिकीट दाखवत विचार करत होते. तीही एकटेपणाला कंटाळलेली दिसली.
'स्टॉकपोर्टहून पुढे कुठे जाणार?'
'...'
'आज चांगले ऊन पडले होते नाही.'
याहून पुढे बोलण्यासारखे काही नसल्याने ती गेली.

थोडा प्रयत्न करता मला भटक्यातल्या एका खेळात मजा येऊ लागली. नऊला तनुने उतरण्याची आठवण केली तेव्हा 'इतक्यात कसे वाजले नऊ' असे आश्चर्यच वाटले. मी आवराआवर करून स्टॉकपोर्टची वाट पाहू लागले. गाडी थांबली. मी दारावर लिहिलेल्या सूचनांप्रमाणे खिडकी उघडली. गार हवेचा जोरदार झोत आत आला. हात बाहेर काढून कडी काढण्याचा प्रयत्न करू लागले. थंड कडी, थंड, बोचरा वारा! हात जवळपास गोठला. कडी तसूभर सुद्धा हलेना. हात आत घेऊन कुठे संकटकाळची कळ वगैरे आहे का याचा शोध घेतला. पण नाही! गाडी पुढे मँचेस्टरला जाणार होती. ती सुटायच्या आत मला उतरायला हवे होते. 'नाही उतरायला आले तर...?' पुन्हा गोळा. 'नाही आले तर मँचेस्टरहून ट्राम पकडून जाऊ. काळजी नको.' मी स्वतःला समजावले. 'चल, एकदाच नीट प्रयत्न करू.'आकृतीत दाखवल्याप्रमाणे डोके बाहेर काढून बाहेर वाकले. हात पोचला. कडी जरा दाबली तर दार उघडले! पटकन बाहेर पडले.
तनुला दाराच्या यशाची बातमी दिली. हवा तो फलाट शोधून तिथे उभी राहिले. नट्सफ़र्डची गाडी दहा मिनिटांनी आली. अगदी साधीसुधी गरीब गाडी. रंग उडालेला, गालिचा नाही, लाकडी बाके, कचरा! अगदी आपल्या आगगाडीसारखे वाटले. शिवाय आतले लोकही साधेसेच होते. जोरदार आवाजात चर्चा करत होते. आत्तापर्यंतच्या प्रवासात सगळे लोक आपापली पुस्तके, मासिके वाचत शांत बसलेले होते. या गाडीतले लोक एकमेकांना ओळखत असावेत किंवा त्यांच्यावर शिष्टपणाचा संस्कार झाला नसावा. गाडीही दरेक पाच मिनिटांना थांबत निवांत चालली होती.
एका गावात शाळकरी मुलींचा एक गट चढला. चेहर्‍यावरची कोवळीक रंगाच्या थरांमागूनही जाणवत होती. प्रत्येकीला आपण नीट दिसतो आहोत कि नाही याची चिंता होती. आरशात पाहून, मैत्रिणीला विचारून अखंड प्रसाधन चालले होते. त्या माझ्या अगदी समोर बसल्या होत्या नि एकमेकांकडे न बघण्याचा शिष्टाचार त्या गाडीत नाही पाळला तरी चालेल हे मला कळले होते त्यामुळे मी पुष्कळ कुतूहलाने पहात होते. मला गंमत वाटत होती. इतक्यात एकीने एक डबी काढली. एक लांबट कागद काढून त्यात त्या डबीतून काहीतरी भरले! तंबाखू? कागदाची गुंडाळी करून कडा चिकटवल्या. बाकीच्या मुली थोडे शांत होऊन पाहू लागल्या. तिने ती बिडी आपल्या ओठात धरली. तेव्हढ्यात तिकीट तपासनीस आला. त्याच्या नजरेतच गाडीत धूम्रपान चालणार नाही असे स्पष्ट लिहिलेले होते. मुलींचा चिवचिवाट अगदीच बंद पडला. बिडी बटव्यात गेली. थोरांच्या चर्चाही मंदावल्या. तपासनीसाने माझे तिकीट पाहिले आणि त्या मुलींना तिकीट विचारले. संध्याकाळी उशीराच्या गाडीत तपासनीस तिकीटे देऊसुद्धा शकतो. म्हणजे तपासनीस आणि वाहक एकच. या मुलींकडे तिकिटासाठी पुरेसे पैसे नव्हते! मग त्यांनी रडके चेहरे करून तपासनीसाकडे गयावया केली. आणि तो द्रवला! त्याने मुलींनी जितके पैसे दिले तितकी तिकीटे दिली आणि बाकीच्यांना फुकट जाऊ दिले.

तपासनीस गेला पण आवाज बंद पडले ते पडलेच. हळू हळू एक दुसरा आवाज जोर धरू लागला. पावसाचा. थांब्यांच्या इमारतींच्या प्रकाशात धोधो कोसळणारा पाऊस दिसू लागला. तनुने भटक्यावर हाक देऊन ती माझी वाट पहातेय असे सांगितले. दोन तीन गावे येऊन गेली आणि नट्सफ़र्ड आले. पिवळट प्रकाशात पावसाच्या पडद्यामागची अक्षरे मला वाचता आली. कितीही धुरकटली असती तरी ती मला वाचता आली असती असे मला वाटले. गाडी थांबली. बाहेर तनु आणि तिची मैत्रिण शशी धुंवाधार पावसात उभ्या होत्या. त्यांनी माझ्यासाठी जास्तीची छत्री, टोपी, हातमोजे वगैरे साहित्य आणले होते. ते झटपट घालून आम्ही झपाझप घरी निघालो. जाता जाता शशीशी मैत्री झाली. तिने वांग्याची भाजी मला आवडते ना असे लगेच विचारून घेतले. घरात पाऊल टाकताच मसालेदार वासांनी नाकाचा आणि एकंदरितच माझा ताबा घेतला. पिशवी टाकून, बूट-मोजे काढून, गरम कपड्यांची आवरणे उतरवून मी बैठकीवर ऐसपैस मांडी घालून बसले. सगळे सांधे हळूहळू सैलावू लागले. गरम पुर्‍या, वांग्याची तमिळ-मसालेदार भाजी, कोशिंबीर आणि पुलाव. अगणित चटण्या, लोणची. शिवाय तोंडी लावायला माझ्या प्रवासाची सुरस कथा. मी एकेक घटना रंगवून रंगवून सांगत होते आणि आम्ही तिघी अखंड हसत होतो. खरंच, त्या पहिल्या वहिल्या प्रवासाचे केवढे अप्रूप वाटले होते. पण आता कळते की माझ्या पश्चिमेतल्या भटकंतीची ही केवळ सुरुवात होती.

5 comments:

Yogesh said...

Hey Mru,
Khoopach chhan lihilays.
Maza vatadyaa hoshil ka mi tikade aalyaawar?

Maitreyee said...

Chhan lihile aahes gg...

निनाद said...

"भारतीय आगगाडी अधिकार्‍यांना ही स्थितप्रज्ञता ब्रिटिशांकडून वारसाहक्काने मिळाली कि काय असे मला वाटून गेले."
मस्त वाक्य!
पहिला अनुभव हां नेहमी खासच असतो यात शंका नाही...

एकुणच लिखाण आवडले हे वेगळे सांगायला नकोच.

-निनाद

Anonymous said...

पश्चिमेतल्या प्रवासाची सुरुवात काळली, पण आणखी काय काय प्रवास केले ते ही लिहा की!

श्रद्धा said...

आणखी काय काय प्रवास केले ते ही लिहा की! >>> +1
गोळे बिळे विरघळून जाऊ लागले.>>> 'विलायतेतही लोक असे करंजीतल्या सारणासारखे प्रवास करतात म्हणजे कमाल आहे बुवा!' >>>>असे बर्फाळ आवाजात सांगितले. >>>>व्वा पाचची लेस्टर गाडी सुद्धा करंजीच होती.>>>तिच्या आवाजातला गेलेला ताण परत डोकावला होता.>>>>तरीच इतकी स्वच्छ टिकली आहे>>>>>कितीही धुरकटली असती तरी ती मला वाचता आली असती असे मला वाटले.>>>>> mRu touch! :)

Intense Debate Comments