Friday 7 March 2008

It's got to go

घराबाहेर पाऊल टाकलं नि एक बस समोरून निघून गेली. जरा अर्धं मिनिट आधी निघायला काय होतं असं मनात म्हणत मी परत घरात शिरले. बाहेर थंडीत १२ मिनिटं उभं राहण्यापेक्षा उबेत घरात थांबलेलं बरं. आत आलेच आहे तर म्हणून मग तीन जिने चढून मघाशी विसरलेली टोपी घेतली. ही नवी टोपी एकदम मस्त आहे. कान झाकणारी. शिवाय तीन वेण्या, दोन बाजूला दोन आणि शेंडीसारखी आणखी एक. मेड इन नेपाळ! पुन्हा बस जायला नको म्हणून मग लगेच बाहेर पडले. बसस्टॉपवर एक आजी आधीपासून उभ्या होत्या. त्यांना गुड मॉर्निंग घालून मी बसच्या वाटेकडे डोळे लावले. नकळत दोन्ही हातांनी कानावरून चाललेल्या टोपीच्या त्या दोन वेण्या ओढल्या आणि आजी बोलत्या झाल्या.
"मस्त टोपी आहे ना!"
"अं... हो. कान झाकते ना, त्यामुळे मला फार आवडली." मी तोंडभर हसून उत्तरले.
या आधी कोणी बसस्टॉपवर असं गुड मॉर्निंग सोडून बोललं नव्हतं. इंग्रज लोकांशी, त्यातून ज्येष्ठांशी बोलायचं म्हणजे मला अजुनी जरा गडबडायला होतं. कुठे काय चुकेल अशी काळजी वाटत राहते.
"दक्षिण अमेरिकेहून आणलीस का? इंकांच्याच असतात ना असल्या टोप्या?"
"इंका!?" मला मी ऐकले ते बरोबर का चूक कळेना. "काय म्हणालात?"
"असल्या कान झाकणार्‍या टोप्या इंकांच्या. तिकडे अँडीज पर्वतांत खूप वारं, थंडी त्यामुळे त्यांनी अश्या कान झाकणार्‍या टोप्या तयार केल्या. त्या आता जगभर गेल्या आहेत. तू कुठे घेतलीस ही टोपी?"
आजींच्या सामान्य ज्ञानावर थक्क होत, मान डोलवत, मी म्हणाले, "इथेच, बाथमध्ये, गावात..."
"सगळीकडे सगळं मिळतं हल्ली"
"हो ना"
खरंतर इथे संभाषण थांबायला हरकत नव्हती. बसची वेळ झालीच होती पण ती येत नव्हती. मी घड्याळात पहातेय हे पाहून आजींनी १२ मिनिटांनी येणारी बस आपण नसतो तेव्हाच फक्त वेळेवर येते हे माझेच आवडते मत व्यक्त केले. मी पुन्हा हो-ना-ले. पण आजी पुढे म्हणाल्या, "मी इथे वर टेकडीवर राहते, तू?"
थेट प्रश्न! मी गडबडून काय सांगावे, का सांगावे अशा विचारात, खरं उत्तर देती झाले, "इथेच, या रस्त्यावर, इथून चौथ्या घरात."
"पण तू आहेस कुठली?"
"आणखी कुठली? भारतातली." आता आजी चौकस आहेत हे मी मान्य करून टाकले.
"पण भारतात कुठे?"
"अं... पश्चिम भारत. महाराष्ट्र. हे म्हणजे भारतातलं एक राज्य आहे. मुंबई, त्याची राजधानी." मी आपली नेहमीची टेप टाकली. "माझे आई बाबा मुंबईच्या दक्षिणेला साधारण ३००किमीवर राहतात."
"अच्छा! मी राजस्थानला गेले आहे." टिपिकल. ब्रिटिश लोक भारत म्हटलं की राजस्थानला जातात.
तितक्यात बस येताना दिसू लागली. बसला हात हलवत मी म्हटलं, "वा वा. सुंदर आहे राजस्थान. मीही जाईन म्हणते कधीतरी."
"चला" बसमध्ये चढता चढता मी म्हणाले.
पण आजी चलत नव्हत्या, "कुठे बसूया?"
मी पुन्हा थक्क. किती गप्पा मारणार आहेत या! समोरासमोरच्या दोन बाकांवर आम्ही बसलो.
"मग कोणती भाषा बोलतेस तू घरी?"
"मराठी. महाराष्ट्रातले लोक मराठी बोलतात. राजस्थानातले राजस्थानी." ऑफिसच्या पार्ट्यांमुळे मला या संवादाचाही चांगलाच सराव होता.
"मग हिंदीचं काय?"
"उत्तरप्रदेश नावाचं आणखी एक राज्य आहे. तिथले, झालंच तर दिल्लीचे लोक हिंदी बोलतात."
"... आणि बॉलिवुड ...?"
"हो, बॉलिवुडचे सिनेमे मुंबईत तयार होतात सहसा. पण ते हिंदीत असतात."
"पण मग वेगवेगळ्या राज्यांतले लोक कोणत्या भाषेत बोलतात?"
"इंग्लिश! म्हणजे तसे वेगवेगळ्या भाषांत बोलू शकतात. पण लसावि इंग्लिश."
"मग हिंदी? ती राष्ट्रभाषा आहे ना?"
"भारताची राजधानी दिल्लीत आहे. म्हणून तिथली भाषा राज्यकारभाराला वापरतात. पण तश्या सगळ्या मुख्य राज्यभाषा चालतात. लोकसभेतले खासदार त्यांच्या मातृभाषेत बोलू शकतात. आणि दुभाषेही असतात."
"तुला कोणत्या भाषा येतात?"
आजी असे थेट माझ्याविषयीचे प्रश्न विचारू लागल्या की मी थोडी चकित होत होते खरी. पण मलाही आता गप्पांमध्ये मजा येऊ लागली होती. हिंदी काही भारताची एकमेव भाषा नाही हे माझं लाडकं मत मांडायची संधी मिळाल्याचा परिणाम.
"मराठी, इंग्लिश, हिंदी. झालंच तर कन्नडा थोडी नि थोडीफार संस्कृत."
खरं म्हणजे अशी यादी सांगितली की सगळे ऐकणारे बर्‍यापैकी कौतुक करतात. पण आजींचा पुढचा प्रश्न तयार होता.
"पण मग तुझं शिक्षण कोणत्या भाषेत झालं?"
"मराठी ..."
"मग इंग्लिश कशी काय शिकलीस तू?"
"पाचव्या इयत्तेपासून आम्ही इंग्लिश तिसरी भाषा म्हणून शिकलो. आता बहुतेक पहिल्या इयत्तेपासूनच शिकवतात."
"पण मग तुला इथे नोकरी कशी मिळाली?"
कशी म्हणजे काय!? हा काय प्रश्न आहे! मला थोडा रागच आला.
"मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. इथे एका चिपा बनवणार्‍या कंपनीत काम करते. तसलं काम मी गेली ८ वर्षे करते आहे. या आधी केंब्रिजमध्ये ..."
"पण तेही मराठीत शिकलीस तू?" आजींना मराठीतला ठ म्हणता येतो हे पाहून मी पुन्हा चकित.
"नाही हो! उच्चशिक्षण इंग्लिशमध्येच होतं. सोळाव्या वर्षांनंतरचं सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये. तोवर इंग्लिश यायला लागलेली असते ना."
"पण त्या आधीचं, गणित, विज्ञान वगैरे?" आजींचे मुद्द्याला हात घालणारे प्रश्न येत होते.
"ते आधी मराठीतच शिकले. गणिताला काही फारशी भाषा लागत नाही. विज्ञानातल्या संज्ञांचे शब्द मात्र नव्याने शिकायला लागले. पण फार काही अवघड नव्हतं ते."
"पण मग आधीपासून इंग्लिशमध्ये शिकली असतीस तर सोपं गेलं असतं ना."
"अं ... काही शाळांत शिकवतात तसं. विज्ञान, गणित इंग्लिशमध्ये आणि बाकी विषय मराठीत. पण आमच्या शाळेत सोय नव्हती. आणि एबीसीडी शिकून थेट इंग्लिशमध्ये एखादा विषयच शिकायचा तेही अवघडच जाणार थोडं."
"लिपी कोणती वापरतात मराठीसाठी?" विषयाचा रूळ बदलण्याचा आजींचा वेग भारी होता.
"देवनागरी. मूळ संस्कृतची लिपी. जशी इंग्लिशची रोमन."
"हम्म. म्हणजे ही अगदी अख्खी भाषा आहे म्हणायची."
"हो मग!"
"किती दिवस टिकणार तशी..."
"म्हणजे!? लाखो लोक बोलतात ही भाषा. साहित्यनिर्मिती होते. न टिकायला काय!"
"पण उपयोग काय?"
"आँ!" मी अवाक्.

"आता बघ, मी ट्युनिशियाला होते काही वर्षं. तर तिथे आमचे शेजारी बर्बर भाषा बोलत."
"ओह! हो, माहितेय मला. पण बर्बर भाषेला लिपी नाहीये ना? फ्रेंच किंवा अरबी भाषेत लिहायचे व्यवहार करतात ना ते?" चला, बर्बर घरमैत्रिणीच्या कृपेने आजींसमोर आपण काही अगदीच 'हे' नाही हे दाखवता आलं.
"तेच ना. तर ते त्यांच्या घरात कायम बर्बर भाषेत बोलणार. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत मुलांना केवळ तीच एक भाषा येते. आणि शाळेत गेल्यावर अचानक सगळे अरबी भाषेत. हाल होतात गं मुलांचे खूप. मी म्हणायची त्यांच्या आयांना, कि घरात थोडं अरबी बोला. मुलांना सवय करा. पण नाही! भाषा हरवून जाईल म्हणे!"
"पण खरंच आहे ना ते", माझ्या डोळ्यासमोर मुलांना गणपतीची आरती शिकवणारे अनिवासी मराठी आईबाबा, "एक भाषा म्हणजे एक संस्कृती असते म्हणतात. जपायला नको का ती? लिपी नसली तरी त्यातली गाणी, वाक्प्रचार ..."
"पण काय उपयोग!" आजींनी बस थांबवण्याचं बटण दाबलं. "एक दिवस जाणारच आहे ना ते सगळं. दरवर्षी सहाशे भाषा गतप्राण होतात म्हणे. त्या कोवळ्या मुलांना द्यायचं का हे मरू घातलेलं ओझ? का उगाच?"
"..." मी काही प्रत्युत्तर द्यायच्या आत त्या उठल्या.
"इतिहास, संस्कृती सगळं वाहत्या नदीसारखं आहे." खिडकीपलिकडच्या न दिसणार्‍या नदीकडे हात करत त्या म्हणाल्या. "थांबून उपयोग नाही."
बस थांबली आणि त्या भराभर उतरून गेल्या.

10 comments:

निनाद said...

वा!
वेगळाच अनुभव आलाय हा!
मी पण विचारात पडलो वाचून.
अर्थात यावर अनेक वाद होऊ शकतील...
मरतायेत म्हणून शिकवायच्याच नाहीत असेही म्हणता येणार नाही असे वाटते.
म्हणजे त्या मरण्याची प्रोसेस वेगात सुरु करायची असा अर्थ होईल.
-निनाद

Raj said...

लेख आवडला. माझेही नेहेमीचे उत्तर 'पश्चिम भारत, मुंबईपासून ३ तासावर' असे असते. :-) आजींशी बराचसा सहमत आहे. भाषेमध्ये होणारे बदल आपण थांबवू शकत नाही. यात 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' च्या नियमाप्रमाणे जे तरले ते तरले. आजींचे शेवटचे वाक्य विशेष भावले.

Mrudula said...

प्रोत्साहनाबद्दल आभार निनाद, राज.

आजींचे मुद्दे बिनतोड खरेच, शिवाय त्यांनी मला प्रतिवादाची संधीही दिली नाही. पण जग जवळ येण्याच्या प्रक्रियेत आपली भाषा नष्ट होणार हे स्विकारायला अवघडच वाटले मला.

HAREKRISHNAJI said...

आपले लिखाण सहजसुंदर आहे. आजच्या लोकसत्ता रविवार वॄत्तात मधे आपल्या बॉगचा उल्लेख वाचला.

विनायक पंडित said...

लेख अप्रतिमच आहे.तुम्ही सराईतपणे सह्ज,सोपं(जे लिहिणं खूप कठीण आहे ते)लिहू शकताय.तुम्ही भरपूर लिहायला पाहिजे!

विनायक पंडित
vinayak-pandit.blogspot.com

Hemant said...

lekha sundar ahe khup mitranna forward pan kela..
aaj kaal raj thakarenchya mule ha vishay chaluch ahe charchan madhe..
pan 1 wegala angle ahe to bhavala..

bhasha maratayat mhanun marun dena kit paat yogya ahe ..
ajun 20-25 varsha kinva jastit jasta 40-50 varsha rahilet marathila apalya hayatitach baghu marathi sampaleli ..

wait watatay :(

Anonymous said...

अतिशय उत्तम लेख लिहिला आहेस. दोन अतिशय वेगळ्या दुनियांधला, पिढ्यांमधला, संस्कृतींमधला हा संवाद कुठेतरी प्रकाशित व्हायला हवा.

तू लिहीत राहायाला हवे.

Mrudula said...

धन्यवाद हरेकृष्णजी, विनायक, हेमंत व अनामिक.

Anonymous said...

Nice post and this mail helped me alot in my college assignement. Gratefulness you seeking your information.

श्रद्धा said...

मराठी मरतेय हे मान्य जरी असलं तरी मुलांचा आई-वडीलांशी-स्वतःशीही संवाद शक्य तितका नैसर्गिकपणे घडवायचा असेल तर तिघांना सामाईक ती भाषा वापरायला काहीच हरकत नसावी. अर्थात, आजींनी तुला काही उत्तर न देण्याची संधीच दिली नाही, हे काही बरोबर नाही केलं. बाकी, आजी होत्या मात्र इंटरेस्टिंग! मुद्देसूद एकदम!

Intense Debate Comments