Wednesday, 27 May 2009

अवघे पाऊणशे वयोमान

परवा टीव्हीवर ग्रँड डिजाइन्स कार्यक्रमात एका सत्तरीच्या जोडप्याचा नवे घर बांधण्याचा उपक्रम दाखवला. डेव्हिड आणि ग्रीटा. खरंतर त्यांच्याकडे पाहून हे सत्तरच्या पुढचे आहेत असं वाटत नाही. प्रेमळ आजी-आजोबांसारखे दिसतात खरे, पण लवलवता उत्साह दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडतो. सूत्रधार केविनने त्यांना विचारलं की तुम्ही हे 'या वयात' घरबिर बांधायचं कसे काय ठरवलं; तर त्या दोघांच्या उत्तरात वयाचा काही संदर्भच नाही. सध्याचं घर दुरुस्त करायला हवं  होतं; त्यात हे असल्या प्रकारचं घर एका ठिकाणी पाह्यलं, आवडलं, आणि हे आपल्याला बांधायलाच हवं हे लक्षात आलं - असलं उत्तर. आणि दोघांचं उत्तर एका सुरात. कुठे मतभेद म्हणून नाही. या कार्यक्रमात अनेकानेक लोकांना त्यांची घरं बांधताना मी बघितलं आहे. कुठे न कुठे प्रत्येक जोडीतला मतभेद बारीक होईना दिसतोच. (बारीक असला तरी हे टीव्हीवाले तो मोठा करून दाखवतातच. ) पण ग्रीटा-डेव्हिडचे सूर कायम जुळलेले.

कार्यक्रमात सुरुवातीला थोडा इतिहास दाखवतात, त्यात त्यांनी घर बांधणाऱ्या तरूण ग्रीटा-डेव्हिडची काळीपांढरी छायाचित्रं दाखवली. दोन फावडी, एक कुदळ आणि घमेल्याची ढकलगाडी आणि आपली जोडी! त्यांचं जुनं घर चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी दोघांनी मिळून बांधलं. पाया खणण्यापासून छपरावर कौलं घालण्यापर्यंत सगळी कामं तर केलीच; पण आतूनही इतकं सुंदर सजवलं की त्या काळातलं देखणं, अद्ययावत घर म्हणून ते प्रसिद्ध झालं. डेव्हिड माणूस कलाकार. त्यानं ठिकठिकाणाहून गोळा केलेल्या कलाकृती, स्वत: बनवलेल्या वस्तू, चित्रं यांच्यामुळं ते घरच एक एकमेवाद्वितीय कलाकृती बनलेलं होतं. आणि आता नवं घर बांधायला हे 'जुनं' घर पाडायला लागणार!

तिकडे एक मोठा यांत्रिक हात जुनं घर हळूवारपणे पाडत असताना केविननं जोडीला विचारलं तुम्हाला कसं वाटतंय. काय पण प्रश्न, टिपिकल टीव्हीवाला, मी मनात म्हटलं. एक तर इतकं सुंदर घर, त्यात तिथे या आजी आजोबांच्या चाळीसेक वर्षांच्या संसाराच्या आठवणी असणार, त्यात आणखी म्हणजे हे त्यांनी स्वतः खपून बांधलेलं घर. किती तुटत असेल मनात! पण आजी आजोबा शांत.
'वाईट तर थोडं वाटणारच, खरं तर हे आमच्या दृष्टीआड झालं असतं तर बरं. या घराचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक फळी नि प्रत्येक भिंत या चार हातांनी बनवलेली, हाताळलेली आहे. पण नव्याला जागा करून देण्यासाठी जुन्याने जायलाच हवं ना! '
जुन्या घरातल्या थोड्या किमती कलावस्तू ठेवून बाकी सगळ्यांची जोडीने विल्हेवाट लावून टाकली.
'शेजारीपाजारी देऊन टाकलं' सहज उत्तर.
मी मनात म्हटलं 'धन्य!' केंब्रिजचं घर सोडताना, मिसळणाचा डबा असाच देऊन टाकताना आपण केव्हढा त्याग करतो आहोत अशी उदात्त भावना माझ्या मनात निर्माण झाली होती. इथे, आनंद वाटण्याचा आनंद केवळ.  

घर तर पाडून टाकलं. म्हणून मग हे दोघं घरासमोरच्या बागेत एका छकड्यात (मोबाईलहोम) राहू लागले. सत्तरीचे दोन म्हातारे जीव. इंग्लंडात सतत पिरपिरणारा पाऊस, बोचरा गारवा. पण जोडीच्या चेहऱ्यावर उत्साह कायम. थोड्या दिवसात नव्या घराचा पाया भरायला माणसं आली. यंत्र आली. एका दिवसात आख्ख्या घराचा पाया खणून, त्यात काँक्रीट भरून गेलीही. डेव्हिड आजोबा कौतुकानं म्हणाले,
'आम्हाला दोन आठवडे लागले होते हो! '
म्हणजे, त्या दोघांनी स्वतःच घर बांधलं होतं तेव्हा.
महिन्याभरानं ट्रकात त्यांच्या घराचे सुट्टे भाग घेऊन लोक आले. एक मोठी क्रेन आली. आणि एकेक करून ते सुटे भाग जुळवायला सुरुवात झाली.
पहिला भाग क्रेनवरून आपल्या जागी गेल्या तेव्हा ग्रीटा आजींनं चक्क दोन उड्या मारल्या. आठवड्याभरात नवं घर उभं झालं. तसा उत्साह वाढतच गेला. पुढे महिनाभर रंगरंगोटी आणि बाकी तपशील भरण्यात गेले. आणि जोडी नव्या घरी राहायला गेलीही.

नंतर टिव्हीवाल्या केविनला घर दाखवताना नव्या बाळाचं असावंसं कौतुक करणारी जोडी पाहून मस्तच वाटलं मला.
'हा माझा भाग आणि तो डेव्हिडचा' घराची निम्मी निम्मी वाटणी ग्रीटा हसत हसत सांगते. इकडची सजावट तिने केली आहे तर तिकडची त्याने. दोन वेगवेगळ्या धर्तीच्या रंगसंगती तरी सूर जुळलेले. नव्या 'मॉडर्न' घरासाठी नव्या जमान्याच्या संकल्पना वापरलेल्या. नव्या कलाकृती, नवी चित्रं आणि शोभून दिसणाऱ्या जुन्या घरातल्या वस्तू. हेही नवं घर आणखी एक एकमेवाद्वितीय कलाकृती बनलेलं. आणि जोडी आपल्या आयुष्य सुंदर करण्याच्या उद्योगात पुन्हा मग्न.

कार्यक्रमात हे घर का बांधावसं वाटलं ते विचारल्यावर जोडीनं सांगितलं, की काय जी दहा वीस वर्षं राहिली आहेत ती आणखी सुंदर करण्यासाठी. दुसरं काय. आणि हे सगळं करण्यासाठी पैसे?
'सत्तरीच्या लोकांना कर्ज देतात का बँका? ' ग्रीटा हसत म्हणाली.
स्वतःच्या खिशातले जमले होते ते सगळे पैसे. आणखी कुठले!  

हा ग्रँड डिजाइन्स कार्यक्रम मी पुष्कळवेळा बघते. घरं अनेक आवडली त्यातली. पण लक्षात राहण्यासारखी जोडी मात्र ही पहिलीच भेटली. सकारात्मक दृष्टिकोन असा जड शब्द मी स्वतःच अनेकदा वापरते. पण असले कसलेही जड शब्द न वापरता थेट जगण्यातच त्याचे प्रतिबिंब दाखवणारी ही जोडी मला फारच आवडली. मला त्यांची कमाल वाटली. कौतुक वाटलं. आणि कुतूहलही. आयुष्यात एव्हढा उत्साह, एव्हढा आशावाद, एव्हढी ऊर्जा कुठून आणत असतील हे लोक?