Sunday 21 January 2007

प्रयोगातून पोळी - १

उण्यापुऱ्या पंचवीस वर्षांच्या आयुष्यात स्वयंपाक करण्याची माझ्यावर कधीच वेळ आली नव्हती. घरी असताना आईला थोडीफार मदत केली होती; अगदीच काही नाही तर स्वयंपाक करताना बघितले तरी होते. बंगलोरात चार वर्षे राहून तीही सवय मोडली. कामावरून आल्यावर आपापल्या खोलीत जाऊन गप्पा टप्पा, नि काकूंची हाक आल्यावर थेट जेवणाच्या टेबलावर. त्यामुळे केंब्रिजला जाऊन आपापला स्वयंपाक करायचा या कल्पनेने मी धास्तावले होते. त्यातून मला भात आवडत नाही. म्हणजे पोळी करायला कसेही करून शिकायलाच पाहिजे होते. जाण्याच्या दोन आठवडे आधी, चार दिवस रजा घेऊन मी स्वयंपाकावरचा 'क्रॅश कोर्स' करण्यासाठी साताऱ्याला गेले.
भाजी हा प्रकार सोपा आहे, हे लगेच लक्षात आले. तेलात काही बाही जिन्नस घालून चिरलेल्या भाज्या घालायच्या. कुठलेसे मसाले घालायचे की झाले. पण पोळीचे काम कठीण दिसत होते. सुरुवात कणीक मळण्यापासून. मुळात आपल्याला चार पोळ्या करायला किती कणीक लागते हे कळणार कसे? मग त्या कणकेत किती पाणी घालायचे, ते कसे कळणार? ही मोजामोजी शिकण्यात एक दिवस गेला. मग पुढची पायरी म्हणजे ती भिजवणे.
दुसऱ्या दिवशी सकाळी, उत्साहाने कणीक भिजवायला घेतली. बरोब्बर मोजून पाणी घालून कणकेत हात घातला की ती सगळी ताबडतोब हाताला चिकटून बसली. बोटही हालवता येईना. उजव्या हाताच्या मदतीला डावा हात गेला तर तोही अडकून बसला! काय करावे कळेना. आई अंघोळीला गेलेली. एकदम लक्षात आले, आईकडे कणीक भिजवण्याचे यंत्र आहे. चमच्याने हात खरवडला आणि त्या यंत्रात सगळी कणीक घातली. यंत्र कसे काय मळते याचेच निरीक्षण करून शिकावे म्हटले. यंत्राचे पातेही सुरुवातीला अडकल्यासारखे झाले पण त्याने नेटाने फिरणे सुरू ठेवले. शेवटी फिरत फिरत त्याने कणकेचा गोळा तयार केला, पण तोपर्यंत मी किमान पंचवीस वेळा यंत्र चालू-बंद केले होते.
कणीक होईपर्यंत आई आली. तिने लगेच लाटायला शिकवायला सुरुवात केली. तिचे बघून लाटणे फिरवल्यावर पोळी आपोआप व्हायला लागते असाच माझा समज झाला. म्हणून लगेच पुढची पोळी करायला घेतली तर कुठचे काय. घडी घालेपर्यंत जरा बरी परिस्थिती होती पण पुढे गोल काही केल्या होईना. "त्रिकोणी झाली तरी चालेल, सगळीकडे समान जाडी असल्याशी कारण", आई म्हणाली, पण तेही होईना. कारण जाडीकडे लक्ष दिले तर पोळीतून अमिबाच्या चलांगांसारखे फाटे निघत होते त्यांना आत वळवावे तर पोळी मध्येच पातळ होत होती. शेवटी ती तव्यावर टाकून उपयोग नाही हे लक्षात आल्यावर तिचा परत गोळा केला व लाटणे आईच्या स्वाधीन केले. समान जाडीचा पहिला नियम कसा काय पाळायचा हे बघायचा प्रयत्न करायला लागले.
आई नक्की काय करते आहे काही लक्षात येत नव्हते. लाटणारा हात आईचा आहे हे माहीत असल्यासारखी पोळी आपोआप होत चालली होती. तेव्हढ्यात मावशी मदतीला आली. मी आलेय म्हणून माझ्या आवराआवरीला मदत करायला ती साताऱ्याला आली होती. "लाटणे फिरवताना जाड्या भागाला काटकोनात लाटणे फिरवायचे म्हणजे तो नीट पसरतो", तिने दुसरा नियम सांगितला. आईच्या अजून दोन पोळ्या झाल्यावर मी पुन्हा प्रयत्न केला. यावेळी जाड्या भागावरून दणादण लाटणे फिरवले. तर त्या भागात लाटा तयार व्हायला लागल्या! "दाबादाबी करायची नाही", मावशीने तिसरा नियम सांगितला. तो तितका नीट न पाळता मी कशीबशी बऱ्यापैकी समान जाडीची पोळी लाटली. तव्यावर टाकली. थोडे छोटे फुगे आले की उलटली. पुन्हा उलटली. पुन्हा, पुन्हा उलटली. काही केल्या फुगेना! "पहिलीच पोळी कशी फुगेल", मावशीने सांत्वन केले. आणि आजच्यासाठी एव्हढे धडे पुरे असे म्हणून पुढच्या पोळ्यांसाठी पोळपाट लाटणे ताब्यात घेतले.
पुढचे दोन दिवस मी २, ३, ४ अशा पोळ्या करण्याचा प्रयत्न केला. मनातल्या मनात नियम घोटले. कणीक भिजवण्यासाठी यंत्राच्या पात्यासारखा हात फिरवून सराव केला. चौथ्या दिवशी सकाळी मला बऱ्यापैकी कणीक मळता यायला लागली. पोळीचे अधले मधले भाग फुगायलाही लागले. संध्याकाळी साताऱ्यातून घ्यायच्या लोणच्यांची, मसाल्यांची बांधाबांध केली. अगदीच वेळ पडल्यास असावा म्हणून आई-बाबांनी एक छोटा कुकर घेऊन दिला. आणि खास माझ्या पोळ्यांसाठी दुसऱ्या मावशीने एक सुंदर लाटणे घेऊन दिले. हे सगळे सामान आणि खूप शुभेच्छा घेऊन मी दोन आठवड्यांनी केंब्रिजला आले.
केंब्रिजला एक आठवडा कसाबसा विश्रांतीगृहात काढला. तिथल्या भोजनालयातले जेवण भारतीय आहे हे मला पदार्थांची नावे वाचल्यामुळे कळले. कधी एकदा आपल्या घरी जाते, आणि (कसा का असेना) आपापला स्वयंपाक करून जेवते असे झाले होते. घरी सामान हालवल्यावर पहिले काम म्हणजे सगळे खाद्यपदार्थ बाहेर काढले. मोठाल्या स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यातल्या कपाटात सगळे भरून टाकले. मग आजच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला काय लागेल याची यादी घेऊन जवळच्या महादुकानात गेले.
बटाटे, कांदे, मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण, टॉमेटो, काहीतरी भाजी, तेल, ... यादीनुसार एकेक वस्तू घेत मी पुढे पुढे चालले होते. चाकू, दूध.. सापडले. कणीक ..? मी 'पीठ' लिहिलेल्या भागात गेले. तिथे गव्हाची दहाबारा प्रकारची पिठे! आता यातली साधी कणीक कुठली? त्याच्यावरची माहिती वाचून सगळी पिठे थेट गव्हापासूनच बनवलेली दिसत होती. 'प्लेन फ़्लॉर' म्हणजे त्यातल्या त्यात निर्धोक असा विचार करून एक दीड किलोचा पुडा ढकलगाडीत टाकला. खरेदी आटोपून घरी येऊन उत्साहाने स्वयंपाकाला सुरुवात केली. बटाट्याची सोप्पी काचऱ्यांची भाजी, टॉमेटोची कोशिंबीर आणि पोळ्या करायचे ठरवले. भाजी, कोशिंबीर तर झाली. आता पोळ्या!
प्लेन फ़्लॉरचा पुडा उघडून चमच्याने मोजून चार पोळ्यांची कणीक एका चिनीमातीच्या ताटात घेतली. कारण माझ्या त्या घरात कणीक भिजवण्यायोग्य कुंडा किंवा कडा असलेली कुठलीच भांडी सापडली नाहीत. कणकेत बरोब्बर मोजून पाणी घातले. आणि मळण्याच्या प्रयत्नाला लागले. मी शिकलेल्या 'यंत्रपद्धतीने' मळणे शक्य नव्हते कारण ताटलीला कडा नव्हत्या. पीठ लगेच उडायला लागले असते. त्यामुळे पुन्हा हात अडकण्याची भीती वाटायला लागली. थोडी यंत्रपद्धती आणि थोडी बोटपद्धती असे करत हळुवारपणे कणीक भिजवली. मस्त पांढरीशुभ्र कणीक! 'इकडची कणीक तिकडच्या कणकेहून शुभ्र कशी?' आणि 'ही नक्की कणीकच आहे ना?' असले प्रश्न बाजूला सारून तवा तापायला ठेवला.
तवा म्हणजे खरेतर फ्राइंग पॅन, काठवाली आणि जाडजूड. मोठ्या शेगडीवर मोठ्ठी आंच ठेवूनही ती तापायला १० मिनिटे लागली. तोवर मी एक प्लास्टिकची पिशवी दुमडून पसरून ओट्यावर पोळी लाटण्यासाठी जागा तयार केली. एका ताटलीत (!) तेल घेतले, दुसरीत कोरडे पीठ घेतले. कणकेतून एक छोटा गोळा काढून घेतला आणि पोळी लाटायला सुरुवात केली. छोटा गोल लाटून घडी घालेपर्यंत सगळे व्यवस्थित झाले. पुढे लाटताना पुन्हा अमिबाचे आकार दृग्गोचर होऊ लागले.
'आकाराकडे लक्ष देऊ नको, सगळीकडून समान जाडी असल्याशी कारण', मी स्वतःला बजावले. आता पोळी पातळ होऊन खालच्या प्लास्टिकच्या कागदावरची नक्षी थोडीफार दिसू लागली. पोळी लाटून झाली असे ठरवून मी ती तव्यावर टाकली. तिच्यावर छोटे फुगे यायला लागल्यावर लगेच उलटली. तर दुसरीकडूनही छोटेच फुगे.
'असो. भाजली गेल्याशी कारण', मनाशी म्हणत मी ती परत उलटली. तर चक्क एक थोडा मोठा फुगा आला! 'अरे वा! जमायला लागले की थोडेफार!' मी आनंदाने पोळी तव्यातून उचलली. जरा तेलाचा हात लावून, घडी करून दुसऱ्या ताटलीत ठेवून दिली.
कणकेतून दुसरा गोळा घेऊन पुढची पोळी. अशी मजल दरमजल करत चार पोळ्या केल्या. त्यातल्या त्यात चांगले म्हणजे तिसऱ्या पोळीला दोन मोठे फुगे आले. मी सगळ्या पोळ्या, भाजी, कोशिंबीर आणि घरून आणलेले लिंबाचे गोड लोणचे असे ताट वाढून घेऊन जेवायला बसले. असे एकटीने जेवण्याचा प्रसंग मला नवा नव्हता, पण यावेळी स्वयंपाक मी केलेला होता. कुणाला तरी आनंदाने ते सांगावेसे वाटत होते, पण कुणाला सांगणार? स्वतःशीच थोडा विचार करत, हसत मी पोळीचा तुकडा तोडला. म्हणजे खरंतर तोडायचा प्रयत्न केला. ती तुटेचना! पोळी गार झालेल्या नानसारखी, 'तन्य' झाली होती. ताणाल तितकी लांब! मी (गप्प असूनही) अवाक् झाले. ही काय नवीन भानगड? घरी मी केलेल्या प्रयोगातून असे उत्पादन कधी मिळाले नव्हते. नक्कीच काहीतरी चुकले होते.
दुपारी मातेला हाक दिली. पोळीची इत्थंभूत हकीकत सांगितली. माझ्या वर्णनावरून मी आणलेले प्लेन फ़्लॉर म्हणजे मैदा असावा असा अंदाज तिने सांगितला. बोलता बोलता, पोळी शिकण्याच्या नादात भात करायला आपण शिकलेलोच नाही, हे माझ्या लक्षात आले. लगेचच भातासाठीच्या सूचना विचारून लिहून घेतल्या. त्या सांगता सांगता, मी भात खाणार या कल्पनेने आईला अगदी भरून आले. संध्याकाळी मग भात केला. कमालीची गोष्ट म्हणजे तो अगदी व्यवस्थित झाला. त्याचे श्रेय तांदूळ, कुकर, पाणी आणि त्या सूचना यांचेच.
पुढचे दोन तीन दिवस मी भेटेल त्या प्रत्येक भारतीयाला पोळीच्या पिठाविषयी विचारले. माझ्या भारतीय सहकाऱ्यांपैकी कोणीच पोळ्या करत नसत. त्यामुळे 'बहुतेक एका पाकिस्तानी दुकानात मिळेल' याहून जास्त समाधानकारक उत्तर कुणाकडूनही मिळाले नाही. ते दुकान गावात असल्याने शनिवारापर्यंत वाट पाहणे भाग होते. तोवर तन्य पोळ्या आणि भात या मेनूला पर्याय नव्हता.
पाकिस्तानी दुकानात पिठांच्या भागात मला 'चपाती फ़्लॉर' नावाचे पीठ सापडले. प्लास्टिकच्या आवरणातून दिसणारा त्याचा रंग संशयास्पद होता; मळका, फिकट तपकिरी, शिवाय बराच कोंडाही दिसत होता. दुकानातल्या मनुष्याकडे चौकशी केली तर त्याने दुसरा 'असली आटा' दाखवला. त्या आट्याचे पोते किमान १० किलोचे! ते मला एक सेमीसुद्धा हालवणे शक्य नव्हते. तेव्हा दीड किलोच्या चपाती फ़्लॉरच्या पुड्यावर समाधान मानून घेतले.

3 comments:

अनु said...

Ajach blog search madhe tuza ha blog tuze nav deun shodhala!
Ajun lihi na blogvar.

Girish, the Gambler said...

Hehe...

Tuza ha poli prakaracha blog vachala aani mazi hasun hasun purewat zali.
Vait vatun gheu nakos, karan changala prayatna hota tuza.

Girish.

संपदा कोल्हटकर said...

सध्या पोळीप्रयोग सुरु असल्यामुळे पुन्हा वाचायला घेतलं.
हेहे.

Intense Debate Comments