आज दुपारी बाजारात गेले होते. बाथ गावात शनिवारचा बाजार असतो. तिथे आजुबाजूच्या खेड्यात पिकलेली भाजी, फळे झालंच तर सरबते, लोणची, मुरंबे, खारवलेले मांसाचे प्रकार मिळतात. उघड्यावर मंडई असते तसा प्रकार. तशी एक बंद मडईदेखील आहे. तीही मी आधी बघितली नव्हती. त्या इमारतीची नक्षीदार दारं आमच्या ऑफिसातून दिसतात त्यामुळे तिथे जायची उत्सुकता होती. शिवाय आज हवा मस्त होती. पंचविसापर्यंत तापमान, हलके हलके ढग त्यामुळे उन्हाचा तडाखा नाही आणि मंद वार्याच्या झुळका. अगदी आल्हाददायक. कधी नव्हे ते गरम जाकीट, कानटोपी वगैरे न घालता बाहेर पडण्याची संधी.
बाहेर पडल्यावर, चालतच जावं की काय असा विचार मनात आला की लगेच बस आली. बसमधे भरपूर टूरिस्ट कपड्यातले लोक. छोटे मोठे कॅमेरे घेतलेले, पाण्याच्या बाटल्या घेतलेले, उन्हाळी कपड्यातले, आनंदी लोक. मीही त्यांच्यातलीच एक होऊन गेले. गावात पोचल्यावर गर्दीबरोबर मी मुख्य चौकात पोचले. बाथमध्ये जी गरम पाण्याची कुडं आहेत, त्याभोवती बरंच जुन्याकाळातलं बांधकाम आहे. अगदी आपल्याकडच्या काळ्या दगडातल्या देवळांसारखं. मला तिथे आत कायम महाबळेश्वरचं कृष्णेच्या उगमाजवळचं देऊळ आठवतं. त्या कुंडांच्या इमारतीच्या दोन बाजूंना रस्ते तर दोन बाजूंना मोकळी दगडी पटांगणं आहेत. तिथे सतत काहीना काही कार्यक्रम चालू असतात. दोन तीन कोपर्यात कोणी कलाकार आपापली वाद्य वाजवत बसलेले असतात. त्यांच्या समोर ते संगीत ऐकत लोक उभे असतात, बसलेले असतात, कधी कधी तर नाचतही असतात. काहीवेळा या वाजवणार्यांच्या समोर त्यांच्या पैसे जमवण्याच्या टोपीबरोबर त्यांच्या संगीताच्या सिड्यासुद्धा ठेवलेल्या असतात. इथे तिथे पुतळे झालेले दोन तीन लोक उभे असतात. आपण समोरून जाताना एकदम शिट्टी वगैरे वाजवून ते दचकवतात. छोट्या, शाळेतल्या वयाच्या मुलांना हे पुतळे लोक आवडतात. ती त्यांच्या समोर उभी राहून पुतळा कधी हलतोय अशी वाट पहात असतात. मग एकदम "अरे! पुतळ्याने मला डोळा मारला" वगैरे म्हणून एकमेकांना टाळ्या देत ती पुढच्या पुतळ्याकडे जातात. असली ही नेहमीची गंमत आजही होती. मी टूरिस्ट व्हायचं ठरवलं होतं त्यामुळे सहजच सुवेनीर-शॉप मध्ये शिरले. आत समोरच शाही आंघोळीच्या गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. रोमन लोकांच्या पद्धतीने आंघोळ कशी करायची त्याची पोस्टरं होती. ते जरा वाचत होते तर बाहेरून एकदम पन्नासेक लोक हसल्याचा आवाज आला. काय ते बघायला मी लगेच बाहेर.
एक माणूस एका एकचाकी उंच सायकलवर चढला होता. आणि काहीतरी मजेदार बोलत होता. कारण लोक सारखे हसत होते. मीही मग जरा पुढे जाऊन उभी राहिले.
".. बरेच लोक मला विचारतात की तू हा खेळ का करतोस? आणि मी म्हणतो मी व्यावसायिक आहे!" मोठा हशा पिकला. "लोक हसतात! काय करणार. पण खरोखर हेच माझं काम आहे. मला मजा येते हे तर खरंच, पण यातून मला रोजची भाजीभाकरी मीठमिरची मिळते", सायकलवरचा डोंबारी सांगत होता. "तेव्हा खेळ संपल्यावर नुसत्या टाळ्या वाजवू नका. टाळ्यांनी छान वाटतं खरं पण पोट भरत नाही. मी अजिबात आडपडदा न ठेवता सांगतो की मी तुमच्या खिशातले पैसे मागतो आहे." हसणारे लोक एकदम शांत झाले.
"ह्मम्म! शांत झाले सगळे. व्हायचेच!" तो म्हणाला. थोडे लोक थोडंसं हसले.
"काळजी करू नका, तुमच्या खिशात पैसे नसले तर हरकत नाही." डोंबारी एक क्षण थांबला नि म्हणाला, "इथे पलिकडेच एक एटिएम आहे!" बरेच लोक हसले.
"आज मी तीन मशालींचा खेळ दाखवणार आहे. खरंतर मशाली हवेत फेकून झेलणं तसं सोपं आहे... अम्म् खरं म्हणजे तेही अवघडच आहे, पण असल्या एकचाकी सायकलीवर तोल सांभाळत मशाली फिरवायच्या म्हणजे जिवावरचा खेळ आहे. म्हणजे माझ्या जिवावरचा." लोक हसले.
"कोणाकडे लायटर आहे?" लोक एकमेकांकडे पाहू लागले. शेवटी एक लायटरवाला सापडला.
"आणि कोणाकोणाकडे वॉलेट आहे?" लोक पुन्हा हसू लागले.
"आणखी म्हणजे मी म्हणालो ते लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या टोपीत जे पैसे टाकाल त्यातून रोजची भाजीभाकरीच तेव्हढी मिळते. जर कोणाची मला पलिकडच्या पबमध्ये बीअर पाजण्याची इच्छा असेल तर अजिबात न लाजता मला सांगा. मीही अजिबात लाजणार नाही." पुन्हा हशा.
लोकांना असं हसवत हसवत त्याने त्या मशाली पेटवल्या. आणि दोन हातात दोन आणि हवेत एक अश्या फिरवायला सुरुवात केली. फिरवता फिरवता पुन्हा पैसे देण्याची आठवण, मधुनच अमेरिकेवर विनोद, फ्रान्सवर विनोद असं करत मग मशाली पायातून फिरवणं किती अवघड आहे ते सांगितलं आणि तश्या फिरवून दाखवल्या. पाचेक मिनिटात खेळ संपला. लोकांना एक दोन साडे माडे तीन म्हणायला सांगून तीनाच्या गजरावर तो सायकलीवरून उतरला आणि मग इतका वेळ मागे भिंतीजवळ ठेवलेली त्याची काळी टोपी पुढे आली.
अहमहमिकेने लोक पैसे द्यायला सरसावले. मीही एक नाणं धरून पुढे गेले. टोपीत नाणं टाकताना पाहिलं, खचाखच नाणी. कुठल्याच वाद्यवादकांना नि पुतळ्यांना, किंवा डोंबार्यांनादेखील मी इतकी नाणी एका फटक्यात जमवताना पाहिलं नव्हतं. या डोंबार्याची पैसे मागायला न लाजण्याची युक्ती चांगलीच यशस्वी झाली होती. 'तुम्ही माझा खेळ बघताय, तर त्याचे पैसे द्या. मी उघड्यावर खेळ करतोय पण स्वान्तसुखाय नाही.' हे त्याने पुन्हापुन्हा सांगितल्यामुळे माझ्यासकट सगळ्यांना पैसे न देता तिथून निघून जाणं चुकीचं वाटलं असणार. मला त्या डोंबार्याचं कौतुक वाटलं. त्याचा गुबगुबीत चेहरा, स्वच्छ चांगल्या प्रतीचे कपडे आणि विनोद करताना इंग्लंडमधल्या राजकारणाचं ज्ञान पाहून तो माझ्यासोबत आलेल्या आनंदी टुरिस्टांपैकीच वाटला. अपरिहार्यपणे सातार्यात पाहिलेले पोटं खपाटीला गेलेल्या डोंबार्यांचे खेळ आठवले. इथला किमान सामाजिक स्तर किती सुस्थितीत असं पुन्हा एकदा जाणवलं. पुन्हा एकदा आपल्या भारतातून लुटलेल्या दौलतीतून हे स्तर वर आलेत असं वाटून गेलं. आणि नेहमीप्रमाणे बाजूचे आनंदी टूरिस्ट दुष्ट फिरंगी दिसू लागले.
विचारात तरंगत पुढच्या पटांगणात गेले तर मोठ्या चर्चसमोर तीनचार लोक हातात पैसे गोळा करण्याच्या बादल्या घेऊन गर्दीतून फिरत होते. ब्रह्मदेशातल्या वादळग्रस्तांसाठी मदत. सुंदर सोनेरी कुरळ्या केसांचा एक तरूण मला म्हणाला, "ब्रह्मदेशातल्या लोकांना मदतीची आवश्यकता आहे."
'दुष्ट गोरा', मी मनात म्हणाले. 'जर याच्या वाडवडिलांनी ब्रह्मदेशाला लुटलं नसतं, तर तिथल्या लोकांवर अशी भिकेला लागण्याची वेळ आली असती का!'
"माझी मदत त्यांच्यापर्यंत पोचेलच याची काय खात्री. शिवाय कुठल्या धार्मिक संस्थेच्या माध्यमातून ही मदत पोचवली तर?" मी वरकरणी छान हसून भराभर बोलले.
"मला धार्मिक मध्यस्थ आवडत नाहीत."
"हरकत नाही. आमच्या कडून नाही तर तुला ज्यांची खात्री वाटेल अश्या लोकांमार्फत मदत कर. पण त्यांना खरोखर मदतीची खूप गरज आहे." तो म्हणाला. मग वळून बाजूच्या एका माणसाला म्हणाला, "ब्रह्मदेशातल्या लोकांना मदतीची आवश्यकता आहे."
"मलाही!" तो माणूस म्हणाला आणि भर्रकन गर्दीत अदृश्य झाला. मीही आपोआप पुढे गेले.
मदत गोळा करणारा तो गोरा दुष्ट की धार्मिक संस्था आहे की नाही हे बघण्याच्या नादात काहीच न करणारी मी भावनाहीन असा त्रास देणारा विचार डोकं खाऊ लागला. तितक्यात एका दुकानाच्या काचेत बाथमध्ये मिळणार्या चिंतामणी निळ्या रंगाच्या भांड्यांकडे माझं लक्ष गेलं. " .. माझ्यासाठी बाथअक्वाब्लूग्लासचं काहीतरी आण.." एका मैत्रिणीची फर्माइश आठवली. डोंबारी, ब्रह्मदेश वगैरे लगेच विसरून मी त्या दुकानात शिरले.
तिथली मला आवडलेली निळी चिमणी मी घेईपर्यंत माझ्या मागे आलेल्या दोन जर्मन मुलींबरोबर उडून गेली. मला तशीच हवी म्हटल्यावर मग त्या काचवाल्या काकूंनी मला त्यांच्या कारखान्याचा पत्ता दिला. "१० मिनिटं लागतील चालायला." मी मान डोलावली. "तिथे सेलही आहे!" काकूंनी मी नक्की कारखाना पाहून येईन अशी व्यवस्था केली. मी मग कारखान्याच्या वाटेला लागले. रस्त्यात ती नक्षीदार दारांच्या इमारतीतली मंडई लागली. हातासरशी पाहून घ्यावी म्हणून मी आत शिरले.
भाज्या, फळं, मासे नि मंडईतले नेहमीचे गडी होतेच. आणखी ससे, हरणं वगैरेंचं मांस, शहामृगाची अंडी असली स्पेशल मंडळीसुद्धा होती. शिवाय तव्याला दांडा बसवून देणारे, कुलपाला किल्ली लावून देणारे, घराची नावं किंवा आकडे रंगवून देणारे असे बरेच लोक दिसले. अगदी गावचा बाजारच! जुनी पुस्तकं, सिड्या, रेकॉर्ड वगैरेचे ढीग, फुलांची दोन तीन दुकानं, ग्रीटींग कार्डाची दुकानं असली इथल्या बाजारातली टिपीकल दुकानं. त्यातल्याच एका 'साजशृंगार' विकणार्या दुकानात मी शिरले. मोठमोठ्या रंगीबिरंगी मण्यांच्या माळा, हाताच्या तळव्याएव्हढी मोठी पदकं, चकाकणार्या चांदीच्या अंगठ्या अश्या गोष्टी पहात, 'कसं काय असलं जाडजूड काय काय घालतात इथल्या बायका' असं मी मनात म्हणत होते. तर दुकानदार आजोबा एकदम समोर आले. मी हसले, "काय सेवा करू?" ते म्हणाले. मी दचकलेच!
"अं.. मी ... मला ... मी एक भेटवस्तू शोधते आहे. छोटी, नाजूक अशी. शिवाय नेहमीपेक्षा वेगळी." गडबडीत तिथे काय नसेल असा विचार करून मी ठोकून दिलं.
"वेगळी.. ह्म्म्म.." आजोबा काचेच्या कपाटाकडे गेले. "हे बघ बरं. खरी फुलं काचेत घालून केलेलं आहे"
त्यांनी माझ्या हातात चारपाच कानातली, गळ्यातली, हातातली ठेवली. नीट पाहिलं तर खरोखर चिमुकली फुलं काचेत गोठवून ठेवलेली. एकन्एक गोष्ट वेगळी, नाजूक नि सुंदर. काय घ्यावं नि काय नाही!
ती काचेतली फुलं व्यवस्थित माझ्या पिशवीत ठेवून मी काचेची चिमणी शोधायला पुन्हा त्या कारखान्याच्या वाटेला लागले. कारखान्याच्या रस्त्यात एका ठिकाणी घराबाहेर बरेच कपडे मांडून ठेवले होते. सगळ्या गोष्टी पाच पौंड किंवा कमी. एव्हढे स्वस्त कपडे! मी चकित झाले. पण त्या घराच्या जवळ आल्यावर आधी नाकाला कळलं नि मग डोळ्यांना... जुने कपडे! कुबट वासाचे. लग्नाच्या मोतिया रंगाच्या झग्यापासून ते इवल्या पोहोण्याच्या कपड्यांपर्यंत सगळ्या प्रकारचे कपडे. त्यात काही हवंसं मिळतंय का शोधणार्या मुली, बायका. हे असले कपडे खरेदी करणारे लोक गरीब असतील का? असतात का इथे गरीब लोक? त्यांना पोहोण्याचे कपडे घालून पोहायला तलाव कुठे मिळतात? असले प्रश्न मनात उमटू लागले. खरंतर कपड्यांजवळच्या बायका अजिबात गरीब दिसत नव्हत्या. ऑफिसातून घरी जाताना, ८ची बस पकडायला धावताना मला हमखास एकदोन भिकारी भेटतात. बीअर प्यायला चिल्लर मागतात. मी बस पकडायला पळते आहे असं सांगितल्यावर बरं म्हणून पुढे जातात. ते गरीब दिसत असतात. थंडीतही जरा ढगळी किंवा पातळ कापडाची जाकीटं घातलेले. पण या बायकांनी तर छान कपडे, मण्यांच्या माळा वगैरे घातलेल्या. असो असो असं म्हणून मी त्या कारखान्यात शिरले.
तिथल्या आजींनी मोठंच स्वागत केलं. स्वत:हून बरीच माहिती दिली. मला हवी तशी चिमणी शोधून दिली. पुन्हा ये म्हणाल्या. मी मग ज्यासाठी घराबाहेर पडले होते त्या खर्या मंडईत जायला निघाले. तिथून पुढे आठवड्याचं इतर किराणासामान घ्यायलाही जायचं होतं. रस्त्यात पुन्हा ते कपडे दिसले. तिथे एक केसांच्या जटा झालेली बाई आणि तिचा काळा कुत्रा. हे खरे गरीब लोक! हे इथले गरीब लोक कायम असली कुत्री पाळतात. गावठी कुत्री. रानटीपणा सोडलेली बिनशेपटीची माकडं म्हणजे माणसं नि त्यांच्या सोबत रानटीपणा सोडलेले लांडगे म्हणजे कुत्रे! रानाबाहेर उघडं, एकटं वाटल्यावर दोघांना एकमेकांचा आधार वाटत असणार. त्या जटाधारी बाईकडे हसून पाहून मी उतारावर पायांची गाडी सोडली.
मंडईत पोचले तेव्हा दुपार कलली होती. फारशी वर्दळ नव्हती. एकाने सुरुवातीलाच 'चीन्यांनो, तिबेटमधून निघून जा!' अशी पाटी लावली होती. तो तिबेटी माणूस मागे निवांत पुस्तक वाचत बसला होता. त्याच्याकडच्या तिबेटी वस्तूंवर नजर टाकली. तर एक मण्यांची माळ आवडली. त्याला पुस्तकतंद्रीतून उठवून ती घेतली नि पुढे आले. भाजी मंडई उठली होती. फक्त चीजवाले, मासेवाले, लोणचीवाले असे लोक शिल्लक होते. आणि गरमागरम सॉसेजेस आणि तत्सम पदार्थ विकणार्या टपर्या. आजही मंडई बघायला जमलं नाही, पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे असं म्हणत मी भराभर सुपरमार्केटाकडे निघाले. अचानक रस्त्यात एक बाई ओरडली, "व्हेज सूप! व्हेज सूप!! खाऊन बघा, पुन्हा याल!" मी लगेच पाहिलं. भूक लागलीच होती. एका टपरीवर एका मोठ्या भांड्यात सूप नि दोन तीन परातींमध्ये भाज्यांचे तळलेले काप, अळूवड्यांसारख्या दिसणार्या वड्या अश्या गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. सूप £२ आणि सँडविच £२.५०. स्वस्त! मी तिकडे वळले की लगेच त्या टपरीतल्या बाईंनी एका छोट्या नक्षीदार वाडग्यात थोडं सूप घालून पुढे केलं. "चव बघ."
"अम्म, मला तर सँडविच हवं आहे!"
"चव तर बघ. कसं झालंय सांग मला. जास्त नाही दिलेलं." त्या एकदम प्रेमळ काकूंसारखं म्हणाल्या
"पण काय काय आहे त्यात? मला अंड्याचा वास आवडत नाही."
"अंडं नाहीये. त्यात एक तर नूडल्स आणि .." त्यांनी चारपाच अगम्य नावं सांगितली. माझ्या चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून, "पालेभाज्या आहेत." असं म्हणून वेगवेगळ्या जुड्या दाखवल्या.
मी हळूच एक चमचा सूप पिऊन पाहिलं. वेगळीच चव लागली. पण आणखी एक चमचा प्यावासा वाटला.
"कुठल्या तुम्ही?" मी.
"इराणी", त्या म्हणाल्या. "कसंय सूप?"
"मस्त!"
"आणि तुम्ही?" टपरीच्या बाहेर उभं राहून 'व्हेज सूप!' म्हणून आरोळी ठोकणार्या बाईंना मी विचारलं.
"मी इथलीच आहे. बाथमधली. मी एका तुर्की माणसाशी लग्न केलं होतं. मला ते पदार्थ आवडतात. म्हणून इथे येऊन खाते!"
'होतं? म्हणजे?' असो असो!
"मी भारतीय आहे."
"ते वाटलंच मला! जैन का?" त्या तुर्की नवर्याशी एकदा लग्न केलेल्या काकू म्हणाल्या.
"अम्म नाही."
"हिन्डू!"
सूपचा चमचा नुक्ताच तोंडात गेला असल्यानं मी नरो वा प्रकारची मान हलवली. 'हिन्डू किंवा फिरू!' डोक्यात गाणं वाजलं.
"तुझ्या सँडविचमध्ये काय घालू?" इराणी काकू.
"अम्म.. कोणत्याही भाज्या घाला. फक्त अंडी नको."
त्यांनी एका मिनिटात एका इराणी भाकरीत खूपश्या भाज्या, त्या अळूवडीसारख्या दिसणार्या वड्या घालून ते 'सॅंडविच' माझ्या हातात दिलं.
ते नेहमीपेक्षा वेगळं पण छान लागलं. मधूनच लिंबाचा किंवा टॉमेटोचा स्वाद आला. बाकी काही ओळखू येत नव्हतं.
दोन्ही बायांचे मनापासून आभार मानून मी तिथून निघाले. किराण्याची खरेदी आटोपून घरी आले. येताना बसमध्ये, अंगावर जागा मिळेल तिथे टोचलेल्या, असंख्य वळी, बाळ्या, कुड्या घातलेल्या लोकांचा एक मोठा गट चढला. असे लोक पुष्कळदा पाहिले होते तरी एकदम असे गटानी पाहिले नव्हते. नको नको म्हटलंतरी नजर तिकडे वळत होती. हे असं का बरं टोचत असतील. विचारावं का या लोकांना. विचारावंसं फार वाटलं पण काही करण्याआधीच माझा स्टॉप आला.
घरी पोचले. सामान लावताना सकाळपासून दिसलेले, भेटलेले एकेक लोक आठवले. किती प्रकारचे! पैसे मागणारे, देणारे, हुशारीने माल विकणारे, निरिच्छपणे बाजारात निवांत वाचत बसलेले, कॅमेरेवाले, बाळ्यावाले, पूर्वेकडचे, पश्चिमेकडचे, अधलेमधले, कसले कसले लोक! नानाविध मार्गांनी जगणं 'अर्थ'पूर्ण करण्याची सगळ्यांची धडपड तेव्हढी सारखी. ही धडपड म्हणजेच काय तो माणूसपणा असणार. आणखी काय!
Sunday, 11 May 2008
Friday, 7 March 2008
It's got to go
घराबाहेर पाऊल टाकलं नि एक बस समोरून निघून गेली. जरा अर्धं मिनिट आधी निघायला काय होतं असं मनात म्हणत मी परत घरात शिरले. बाहेर थंडीत १२ मिनिटं उभं राहण्यापेक्षा उबेत घरात थांबलेलं बरं. आत आलेच आहे तर म्हणून मग तीन जिने चढून मघाशी विसरलेली टोपी घेतली. ही नवी टोपी एकदम मस्त आहे. कान झाकणारी. शिवाय तीन वेण्या, दोन बाजूला दोन आणि शेंडीसारखी आणखी एक. मेड इन नेपाळ! पुन्हा बस जायला नको म्हणून मग लगेच बाहेर पडले. बसस्टॉपवर एक आजी आधीपासून उभ्या होत्या. त्यांना गुड मॉर्निंग घालून मी बसच्या वाटेकडे डोळे लावले. नकळत दोन्ही हातांनी कानावरून चाललेल्या टोपीच्या त्या दोन वेण्या ओढल्या आणि आजी बोलत्या झाल्या.
"मस्त टोपी आहे ना!"
"अं... हो. कान झाकते ना, त्यामुळे मला फार आवडली." मी तोंडभर हसून उत्तरले.
या आधी कोणी बसस्टॉपवर असं गुड मॉर्निंग सोडून बोललं नव्हतं. इंग्रज लोकांशी, त्यातून ज्येष्ठांशी बोलायचं म्हणजे मला अजुनी जरा गडबडायला होतं. कुठे काय चुकेल अशी काळजी वाटत राहते.
"दक्षिण अमेरिकेहून आणलीस का? इंकांच्याच असतात ना असल्या टोप्या?"
"इंका!?" मला मी ऐकले ते बरोबर का चूक कळेना. "काय म्हणालात?"
"असल्या कान झाकणार्या टोप्या इंकांच्या. तिकडे अँडीज पर्वतांत खूप वारं, थंडी त्यामुळे त्यांनी अश्या कान झाकणार्या टोप्या तयार केल्या. त्या आता जगभर गेल्या आहेत. तू कुठे घेतलीस ही टोपी?"
आजींच्या सामान्य ज्ञानावर थक्क होत, मान डोलवत, मी म्हणाले, "इथेच, बाथमध्ये, गावात..."
"सगळीकडे सगळं मिळतं हल्ली"
"हो ना"
खरंतर इथे संभाषण थांबायला हरकत नव्हती. बसची वेळ झालीच होती पण ती येत नव्हती. मी घड्याळात पहातेय हे पाहून आजींनी १२ मिनिटांनी येणारी बस आपण नसतो तेव्हाच फक्त वेळेवर येते हे माझेच आवडते मत व्यक्त केले. मी पुन्हा हो-ना-ले. पण आजी पुढे म्हणाल्या, "मी इथे वर टेकडीवर राहते, तू?"
थेट प्रश्न! मी गडबडून काय सांगावे, का सांगावे अशा विचारात, खरं उत्तर देती झाले, "इथेच, या रस्त्यावर, इथून चौथ्या घरात."
"पण तू आहेस कुठली?"
"आणखी कुठली? भारतातली." आता आजी चौकस आहेत हे मी मान्य करून टाकले.
"पण भारतात कुठे?"
"अं... पश्चिम भारत. महाराष्ट्र. हे म्हणजे भारतातलं एक राज्य आहे. मुंबई, त्याची राजधानी." मी आपली नेहमीची टेप टाकली. "माझे आई बाबा मुंबईच्या दक्षिणेला साधारण ३००किमीवर राहतात."
"अच्छा! मी राजस्थानला गेले आहे." टिपिकल. ब्रिटिश लोक भारत म्हटलं की राजस्थानला जातात.
तितक्यात बस येताना दिसू लागली. बसला हात हलवत मी म्हटलं, "वा वा. सुंदर आहे राजस्थान. मीही जाईन म्हणते कधीतरी."
"चला" बसमध्ये चढता चढता मी म्हणाले.
पण आजी चलत नव्हत्या, "कुठे बसूया?"
मी पुन्हा थक्क. किती गप्पा मारणार आहेत या! समोरासमोरच्या दोन बाकांवर आम्ही बसलो.
"मग कोणती भाषा बोलतेस तू घरी?"
"मराठी. महाराष्ट्रातले लोक मराठी बोलतात. राजस्थानातले राजस्थानी." ऑफिसच्या पार्ट्यांमुळे मला या संवादाचाही चांगलाच सराव होता.
"मग हिंदीचं काय?"
"उत्तरप्रदेश नावाचं आणखी एक राज्य आहे. तिथले, झालंच तर दिल्लीचे लोक हिंदी बोलतात."
"... आणि बॉलिवुड ...?"
"हो, बॉलिवुडचे सिनेमे मुंबईत तयार होतात सहसा. पण ते हिंदीत असतात."
"पण मग वेगवेगळ्या राज्यांतले लोक कोणत्या भाषेत बोलतात?"
"इंग्लिश! म्हणजे तसे वेगवेगळ्या भाषांत बोलू शकतात. पण लसावि इंग्लिश."
"मग हिंदी? ती राष्ट्रभाषा आहे ना?"
"भारताची राजधानी दिल्लीत आहे. म्हणून तिथली भाषा राज्यकारभाराला वापरतात. पण तश्या सगळ्या मुख्य राज्यभाषा चालतात. लोकसभेतले खासदार त्यांच्या मातृभाषेत बोलू शकतात. आणि दुभाषेही असतात."
"तुला कोणत्या भाषा येतात?"
आजी असे थेट माझ्याविषयीचे प्रश्न विचारू लागल्या की मी थोडी चकित होत होते खरी. पण मलाही आता गप्पांमध्ये मजा येऊ लागली होती. हिंदी काही भारताची एकमेव भाषा नाही हे माझं लाडकं मत मांडायची संधी मिळाल्याचा परिणाम.
"मराठी, इंग्लिश, हिंदी. झालंच तर कन्नडा थोडी नि थोडीफार संस्कृत."
खरं म्हणजे अशी यादी सांगितली की सगळे ऐकणारे बर्यापैकी कौतुक करतात. पण आजींचा पुढचा प्रश्न तयार होता.
"पण मग तुझं शिक्षण कोणत्या भाषेत झालं?"
"मराठी ..."
"मग इंग्लिश कशी काय शिकलीस तू?"
"पाचव्या इयत्तेपासून आम्ही इंग्लिश तिसरी भाषा म्हणून शिकलो. आता बहुतेक पहिल्या इयत्तेपासूनच शिकवतात."
"पण मग तुला इथे नोकरी कशी मिळाली?"
कशी म्हणजे काय!? हा काय प्रश्न आहे! मला थोडा रागच आला.
"मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. इथे एका चिपा बनवणार्या कंपनीत काम करते. तसलं काम मी गेली ८ वर्षे करते आहे. या आधी केंब्रिजमध्ये ..."
"पण तेही मराठीत शिकलीस तू?" आजींना मराठीतला ठ म्हणता येतो हे पाहून मी पुन्हा चकित.
"नाही हो! उच्चशिक्षण इंग्लिशमध्येच होतं. सोळाव्या वर्षांनंतरचं सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये. तोवर इंग्लिश यायला लागलेली असते ना."
"पण त्या आधीचं, गणित, विज्ञान वगैरे?" आजींचे मुद्द्याला हात घालणारे प्रश्न येत होते.
"ते आधी मराठीतच शिकले. गणिताला काही फारशी भाषा लागत नाही. विज्ञानातल्या संज्ञांचे शब्द मात्र नव्याने शिकायला लागले. पण फार काही अवघड नव्हतं ते."
"पण मग आधीपासून इंग्लिशमध्ये शिकली असतीस तर सोपं गेलं असतं ना."
"अं ... काही शाळांत शिकवतात तसं. विज्ञान, गणित इंग्लिशमध्ये आणि बाकी विषय मराठीत. पण आमच्या शाळेत सोय नव्हती. आणि एबीसीडी शिकून थेट इंग्लिशमध्ये एखादा विषयच शिकायचा तेही अवघडच जाणार थोडं."
"लिपी कोणती वापरतात मराठीसाठी?" विषयाचा रूळ बदलण्याचा आजींचा वेग भारी होता.
"देवनागरी. मूळ संस्कृतची लिपी. जशी इंग्लिशची रोमन."
"हम्म. म्हणजे ही अगदी अख्खी भाषा आहे म्हणायची."
"हो मग!"
"किती दिवस टिकणार तशी..."
"म्हणजे!? लाखो लोक बोलतात ही भाषा. साहित्यनिर्मिती होते. न टिकायला काय!"
"पण उपयोग काय?"
"आँ!" मी अवाक्.
"आता बघ, मी ट्युनिशियाला होते काही वर्षं. तर तिथे आमचे शेजारी बर्बर भाषा बोलत."
"ओह! हो, माहितेय मला. पण बर्बर भाषेला लिपी नाहीये ना? फ्रेंच किंवा अरबी भाषेत लिहायचे व्यवहार करतात ना ते?" चला, बर्बर घरमैत्रिणीच्या कृपेने आजींसमोर आपण काही अगदीच 'हे' नाही हे दाखवता आलं.
"तेच ना. तर ते त्यांच्या घरात कायम बर्बर भाषेत बोलणार. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत मुलांना केवळ तीच एक भाषा येते. आणि शाळेत गेल्यावर अचानक सगळे अरबी भाषेत. हाल होतात गं मुलांचे खूप. मी म्हणायची त्यांच्या आयांना, कि घरात थोडं अरबी बोला. मुलांना सवय करा. पण नाही! भाषा हरवून जाईल म्हणे!"
"पण खरंच आहे ना ते", माझ्या डोळ्यासमोर मुलांना गणपतीची आरती शिकवणारे अनिवासी मराठी आईबाबा, "एक भाषा म्हणजे एक संस्कृती असते म्हणतात. जपायला नको का ती? लिपी नसली तरी त्यातली गाणी, वाक्प्रचार ..."
"पण काय उपयोग!" आजींनी बस थांबवण्याचं बटण दाबलं. "एक दिवस जाणारच आहे ना ते सगळं. दरवर्षी सहाशे भाषा गतप्राण होतात म्हणे. त्या कोवळ्या मुलांना द्यायचं का हे मरू घातलेलं ओझ? का उगाच?"
"..." मी काही प्रत्युत्तर द्यायच्या आत त्या उठल्या.
"इतिहास, संस्कृती सगळं वाहत्या नदीसारखं आहे." खिडकीपलिकडच्या न दिसणार्या नदीकडे हात करत त्या म्हणाल्या. "थांबून उपयोग नाही."
बस थांबली आणि त्या भराभर उतरून गेल्या.

Subscribe to:
Posts (Atom)